शैक्षणिक वाटचाल व प्रवास
महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक समाजसुधारकांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. गरीब, गांजलेल्या, मागासलेल्या समाजासाठी महात्मा फुले यांच्यापासून डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबांपर्यंत अनेकांनी मोलाचे कार्य केलेले आहे. दारिद्र्य अज्ञान व अंधश्रद्धा यात पिचत पडलेल्या दुखी समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरे प्रभावी साधन नाही हे गाडगे बाबांनी ओळखले होते. गाडगे बाबांनी याच जाणीवेतून श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईची स्थापना सन १९५२ रोजी केली. त्यानंतर श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईच्या अंतर्गत श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या माध्यमातून सन १९६० रोजी श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, सन १९७० रोजी श्री गाडगे महाराज विद्यालय, सन १९७३ रोजी श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा यांची स्थापना करण्यात आली. परिसरातील गरजू, गरीब, अनाथ व आदिवासी मुलांच्या शिक्षणाची व निवासाची सोय व्हावी या हेतूने श्री गाडगे महाराज जनता विकास वसतिगृह, श्री गाडगे महाराज आदिवासी विकास वसतिगृह, श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम यांची स्थापना करण्यात आली. बदलत्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज जाणवू लागल्याने श्री गाडगे महाराज इंग्लिश मेडियम विद्यालयाची देखील स्थापना करण्यात आली.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे श्री गाडगे महाराजांच्या दशकलमी संदेशानुसार कार्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांना आधुनिक काळात दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी विविध सोयी-सुविधा देण्याचे काम केलेले आहे. ओतूर परिसर हा शिक्षणासाठी पूर्वीपासून नावाजलेला आहे. या प्रगत भागात शिक्षण क्षेत्रात टिकून राहायचे असेल, तर इतरांच्या बरोबर स्पर्धा करणे आवश्यक आहे याची जाणीव ठेऊन विविध विभाग सुरु करण्यात आलेले आहेत. तज्ञ व प्रशिक्षित विषयानुरूप शिक्षक वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, हवेशीर वर्ग खोल्या, क्रीडा साहित्य, सहशालेय उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, विविध स्पर्धा, संगणक कक्ष, भव्य क्रीडांगण अशा विविध सोयी-सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या असल्याने गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत जाणारा आहे. एकाच संकुलात विविध शैक्षणिक शाखा असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणे सहज शक्य होते. वेगवेगळ्या भागातील व वेगवेगळे आर्थिक स्तर असणारे विद्यार्थी एकाच छताखाली शिक्षण घेत असल्याने विविध सांस्कृतिक मुल्यांची पेरणी करण्याचे महत्तम कार्य या संकुलात निरंतर सुरु आहे. आमच्या अनेक विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच शिक्षकांनी देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत विविध पुरस्कार मिळवलेले आहेत.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे श्रेय हे सर्वस्वी वै.प्रल्हादराव मारुती पाटील साहेब यांना जाते. त्यांनी श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या संचालक पदाची धुरा सक्षमपणे पेलत श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईच्या विकासातही मुख्य भूमिका बजावली. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे सेवाभावी पुरस्कार, शिवनेरी भूषण पुरस्कार असे इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल. ओतूरचे विद्यमान संचालक मा.श्री.नितीन पाटील साहेब यांना महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षण भूषण पुरस्कार २०१७ प्राप्त झालेला आहे. श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर येथे वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे श्री. राजकुमार वसंतराव मिरगे यांना मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा यांच्याकडून ‘गुणवंत लिपिक’ म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, ओतूर येथे कार्यरत असलेले श्री रंजित पवार यांनी आपला ठसा साहित्यिक क्षेत्रात उमटवलेला असून त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी देश-परदेशात सेवा देत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात आमचे विद्यार्थी आपले वेगळेपणे सिद्ध करत असल्याने संकुलाचे नाव मोठे होत आहे. ‘सेवा परमो धर्म:’ हे ब्रीद जपत असताना सेवेचे हे व्रत आमचे विद्यार्थीदेखील जपत असल्याने त्याचा आम्हाला आनंद आहे.
सुरुवातीच्या काळात ओतूर परिसरात शिक्षकांना राहण्यासाठी खोल्या मिळण्याची मोठी अडचण होत असे. याची जाणीव ठेऊन श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलात कार्यरत शिक्षकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी गावात जागा घेऊन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले व त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या निवासाची सोय करण्यात आली. शाळा सुरु झाल्यानंतर जसजसे पुढील वर्ग वाढत होते, तसतशी शिक्षकांची संख्या वाढत होती. त्याकाळात बहुतांशी शिक्षक हे शेतकरी कुटुंबातील होते व बहुतेकांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यात त्याकाळात मिळणारे वेतन हे देखील अतिशय कमी असायचे. यातून घरखर्च भागवून इतर गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी शिल्लक राहत नसे. त्यामुळे अनेकदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असे. या अडचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन संचालक मा.श्री. प्रल्हादराव पाटील साहेब यांच्या पुढाकारातून श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या कर्मचारी वर्गाची एक पतपेढी सुरु करण्यात आली. या पतपेढीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम तत्कालीन संचालक, मुख्याध्यापक यांनी केले. या पतपेढीतून वेळेवर पतपुरवठा झाल्याने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करणे सहज शक्य झाले. अनेकांनी आपल्या आरोग्यावर होणाऱ्या खर्चासाठी याच पतपेढीची मदत घेतली. एकंदरीत श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलात शिक्षक कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम देखील केलेले आहे.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या आज पर्यंतच्या प्रवासात वै.शिंदे महाराज, वै.वाघ महाराज, वै.माळी महाराज, वै.जोशी बाबा, वै. जिजाबा मोहिते पाटिल यांची प्रेरणा होती. तर माजी आमदार कै.श्रीकृष्ण रामजी तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य कै. वसंतराव नानाजी पाटील, कै. दादाभाऊ नारायण पाटील डुंबरे यांची खंबीर साथ लाभली.

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरची उद्दिष्टे व वैशिष्टे
- विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
- वंचित, गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व शिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे.
- समाजाचा मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याचा असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रबोधन करणे व जास्तीत जास्त मुलींना आपल्या संकुलात प्रवेश देऊन त्यांना शिक्षण देणे.
- राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील असे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे. त्यासाठी श्री गाडगे बाबांच्या विचारांची विविध सहशालेय उपक्रमांतून सक्षमपणे पायाभरणी करणे.
- विद्यालय, आश्रमशाळा व वसतिगृहात विविध जाती धर्माच्या मुला-मुलींना मोफत प्रवेश देणे.
- शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उदा. वह्या, पुस्तके, पेन्सिली, पेन, कंपास, रंगपेटी, शालेय गणवेश इत्यादी उपलब्ध करून देणे.
- वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरहजेरी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.
- वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पोषक असे जेवण उपलब्ध करून देणे.
- डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडा विभाग, भाषा मंडळ, विज्ञान मंडळ, पर्यावरण कक्ष इत्यादींची स्थापना करणे.
- पालक वर्गाच्या प्रबोधन सत्रांचे आयोजन करून त्यांना विविध शासन स्तरावरील योजनांची माहिती देणे.
- दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देणे.
- वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देणे.
- शालेय तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत योग्य तो औषधोपचार देणे.
- आश्रमशाळा व वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, केसांसाठी तेल देणे.
- गाडगे बाबांचे विचार व संदेश समाजात रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
- अस्पृश्यता निवारण प्रचार कार्य करणे.
- विविध स्पर्धा, परीक्षा यांच्यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढीस लागावी म्हणून उपक्रमांचे आयोजन करणे.
- वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी शालेय बसची व्यवस्था करणे.
- विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी आणि स्वयंपूर्ण व सुसंस्कृत भारतीय नागरिक तयार करण्यासाठी संस्कार शिबिरांचे आयोजन करणे.
- विद्यार्थ्याने शिक्षण संकुलात प्रवेश घेतल्यानंतर त्याचा परिपूर्ण विद्याभ्यास करून घेण्यासाठी रात्रअभ्यासिका, जादा तासिकांचे आयोजन करणे.
- वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरांचे, समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेणे.
- परिसरातील शाळांच्या मदतीने देशभक्तीपर, सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेणे.
- सहशालेय उपक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे.
- शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून तालुका, जिल्हा, प्रकल्प, विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी सराव शिबिरांचे आयोजन करणे.
- विविध समाजसुधारक, क्रांतिकारक यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करणे.