‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलात आश्रमशाळेबरोबरच पुढील प्रमाणे वसतिगृह असून अनेक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाची सोय झालेली आहे.
श्री गाडगे महाराज आदिवासी विद्यार्थी वसतिगृह हे सन १९६० साली स्थापन झाल्याने परिसरातील अनके गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्यंत तुटपुंज्या अनुदानात सुरु झालेले हे वसतिगृह श्री प्रल्हादराव मारोतीराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अल्प कालावधीत प्रसिद्धीस आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ मा.श्री. रामदास डामसे हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. वसतिगृहात मोफत जेवण, नाष्टा, निवासाची सोय झाल्याने मुरबाड, शहापूर, अकोले, राजूर, संगमनेर, चाकण, आंबेगाव, जुन्नर परिसरातील अनेक विद्यार्थी यामध्ये शिक्षणासाठी येतात. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी अधिक्षकाची नेमणूक केलेली असून स्वयंपाकासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सुसज्ज इमारत व निवासाची उत्तम सोय असल्याने गरीब आदिवासी विद्यार्थी मोठ्या आनंदाने येथे शिक्षण घेत आहेत.
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज जनता विकास वसतिगृहाची स्थापना १९६० साली केल्यामुळे ओतूर परिसरातील बहुजन वर्गातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय झाली. त्या काळात परिसरात शाळांची संख्या कमी होती. त्यामुळे शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे. सर्वच विद्यार्थ्यांना रोज ये जा करून शिक्षण घेणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी इच्छा असूनही शाळा शिकू शकत नव्हते. या वसतीगृहाच्या स्थापनेमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग उघडला गेला. आज या वसतिगृहास स्वतंत्र इमारत असून विद्यार्थ्यांच्या निवासाची व जेवणाची मोफत सोय करण्यात आलेली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी अधिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली असून स्वयंपाक बनविण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे बाबा कन्या छात्रालयाची स्थापना सन १९६० साली करण्यात आलेली आहे. मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याचा तत्कालीन समाजाचा दृष्टीकोन बघितला तर सदर कन्या छात्रालयाची स्थापना म्हणजे मुलींच्या शिक्षणातील एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल. मुलींना घरापासून दूर शिक्षणासाठी वसतिगृहात पाठविण्याची मानसिकता कुणाचीही नसायची. परंतु श्री गाडगे महाराज यांचे विचार व श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथील संचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सततच्या पालक भेटी व जनजागृतीमुळे अनके मुलींना वसतिगृहात शिक्षणासाठी पाठवायला सुरुवात झाली. वसतिगृह म्हटले कि पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. परंतु योग्य देखरेख व शैक्षणिक वातावरण यांची योग्य खात्री पटल्याने पालक निश्चितपणे मुलींना कन्या छात्रालय, ओतूर येथे पाठवत आहेत. छात्रालयासाठी स्वतंत्र व सुरक्षित इमारत आहे. मुलींच्या जेवणाची, नाष्ट्याची मोफत सोय केली जाते. तसेच शिक्षणासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश इत्यादी साहित्यही मोफत उपलब्ध करून देण्यात येते. ‘चूल आणि मुल’ हा मुलींकडे बघण्याचा समाजाचा असणारा दृष्टीकोन दूर करून अनेक मुली आज या छात्रालयात शिक्षण घेत आहेत. आज पर्यंत या वसतिगृहात शिकून गेलेल्या अनेक मुली विविध पदांवर कार्यरत असून त्यांच्या यशात या छात्रालयाची प्रमुख भूमिका आहे हे त्या प्रांजळपणे कबुल करतात.
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी सर्वच पालक जागरूक असतात. परंतु समाजात अशी काही बालके असतात कि ज्यांना कोणीच पालक नसते. अशा अनाथ, निराधार मुलांना योग्य शिक्षण व संस्कार मिळाले नाही, तर ती मुले गुन्हेगारीकडे वळतात. काही मुलांचा अतोनात छळ केला जातो. काहींना गुलाम बनवून त्यांच्याकडून कामे करवून घेतली जातात. एकंदरीत या निराधार निष्पाप बालकांचे शोषण केले जाते. अशा निराधार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे सन १९८२ मध्ये श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रमाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या बालकाश्रमात ७५ विद्यार्थी क्षमतेस मान्यता देण्यात आलेली होती. योग्य संगोपन, मोफत जेवण, नाष्टा, निवास, गणवेश, अंथरूण, पांघरून इत्यादींची सोय झाल्याने प्रवेशासाठी मागणी वाढत गेली. शेवटी सन २००९ मध्ये शासनाने यात अधिक ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी दिली. बालकांचे हक्क हा दयेचा भाग नसून तो समाज व शासनाच्या कर्तव्याचा अनिवार्य भाग आहे. याच जाणीवेतून या वसतिगृहातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलातील सर्व कर्मचारी करत आहेत.