• वर्गखोल्या : शाळेतील वर्गखोल्या ह्या प्रशस्त आहेत. वर्ग खोल्या हवेशीर असून वातावरण प्रसन्न व आनंददायी आहे. वर्गात हवा खेळती राहण्यासाठी समोरासमोर खिडक्या आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश येण्यासाठी सुयोग्य व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थी आवडीने दिवसभर अध्ययन करताना कंटाळत नाहीत. विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात. " ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे "

  • ई लर्निंग : आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही स्पर्धेच्या युगात मागे राहू नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना अनेक सुविधांचा लाभ मिळत आहे अनेक विद्यार्थ्यांनी ई लर्निंग चे प्रशिक्षण घेतलेले असून विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर वापर करून देतात.

  • संगणक कक्ष : संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे म्हणून विद्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष आहे . तसेच विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य विभाग असून त्या ठिकाणी फिल्म प्रोजेक्टरची सोय आहे. विद्यार्थ्यांना माहितीपट तसेच वैज्ञानिक ऐतिहासिक फिल्म या ठिकाणी दाखवल्या जातात. " हे विज्ञान युग आहे हे विज्ञान योग आहे अग्नीचा लागता शोध अंधार दूर झाला मिळता उर्जा शक्ती मानव पुढे चालला संगणकीय किमानहे विज्ञान युग आहे हे विज्ञान योग आहे अग्नीचा लागता शोध अंधार दूर झाला मिळता उर्जा शक्ती मानव पुढे चालला संगणकीय किमयाने तर दिग्विव्य विजयच केला".

  • विज्ञान प्रयोगशाळा : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी विद्यालयात प्रशस्त व भव्य विज्ञान प्रयोगशाळा आहे. प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. विद्यालयातील अनेक विद्यार्थी दरवर्षी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन क्रमांक प्राप्त करीत आहेत. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचे कार्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री. डी. जी. सोनवणे, श्री. डी. डी. पाटील, श्री.ए . एस पाटील, श्री. एस. ओ. बोंबटकार हे करीत आहेत. या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात तब्बल सहा वेळा राज्यस्तरीय व एक वेळा राष्ट्रीय पातळीवर विद्यालयाचे नाव चमकवले आहे. याच प्रयोग शाळेतून संशोधनाचे बाळकडू घेतलेले अनेक विद्यार्थी आज संशोधक म्हणून कार्य करीत आहेत. अनेकांनी परदेशात भरारी देखील घेतली आहे.

  • वाचनालय : “वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वचनाप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वतंत्र सुसज्ज वाचनालय कक्ष आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले जाते. विद्यालयात नियमितपणे वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली जातात.

  • ग्रंथालय व भूगोल विभाग : “वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा” विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तृत करण्यासाठी त्यांना पुस्तकांच्या विश्वात घेऊन जाण्यासाठी विद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय असून त्यामध्ये विविध विषयांवर आधारित हजारो पुस्तके आहेत. यात कथा, काव्य, कादंबऱ्या, खंड काव्य, पुराणग्रंथ, विज्ञान ग्रंथ, भाषेचे शब्दकोश, बाल साहित्य गोष्टींची पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच भौगोलिक ज्ञान व क्षेत्रभेटीसाठी भौगोलिक कक्ष देखील आहेत. यात चार्ल्स मॉडेल टेलिफोन्स यासारखे अद्यावत साहित्य देखील आहे. ग्रंथालयाची सर्वस्वी जबाबदारी श्री.महेश पंधरे हे सांभाळतात. तर भूगोल विभाग श्री. रामदास बगाड व श्री. सुनील खुपसे पाहतात.

  • क्रीडा विभाग : शरीर, मन आणि बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण. म्हणून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास ही साधला जावा यासाठी विद्यालयात खेळासाठी प्रशस्त मैदान देखील आहेत. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. खो खो ची तीन मैदाने, कबड्डी ची तीन मैदाने व व्हॉलीबॉल साठी दोन मैदाने आहेत. कुस्तीसाठी हौद देशी-विदेशी खेळांचे भरपूर साहित्य विद्यालयात उपलब्ध आहे. तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव रोशन केले आहे. अनेक विद्यार्थी वैयक्तिक खेळात देखील चमकले आहेत. यासाठी क्रीडा शिक्षक श्री. प्रकाश मोधे व श्री .सुनील खूपसे यांचे कुशल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे. तसेच विद्यालयांमध्ये स्काऊट गाईड व महाराष्ट्र शास्त्र सेना यांचे पथकही चालवले जातात.

  • आरोग्य : “आरोग्यम् धनसंपदा” हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना नेहमी दिला जातो. यासाठी विद्यालयात दर शनिवारी MD च्या तासाला व्यायामाचे प्रकार व योगा विद्यार्थ्यांना शिकवला जातो. स्वच्छता या विषयावर अनेक व्याख्याने आयोजित केली जातात. गाडगेबाबांनी गावे साफ करून नंतर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनं साफ केली. हे बाबांचे कार्य विद्यार्थ्यांना ज्ञात असल्यामुळे विद्यार्थी स्वतःचे आरोग्य देखील सांभाळतात. योग्य आहार व स्वच्छ जल याचे महत्त्व देखील समजावून विद्यार्थ्यांना दिले जाते.

  • सहशालेय उपक्रम : विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न व्हावा यासाठी विद्यालयात नियमितपणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, राखी बनवणे, आकाश कंदील, पणत्या बनवणे, वस्तू निर्मिती करणे अशा विविध स्पर्धा प्रसंगानुसार आयोजित केल्या जातात. विविध महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरा करून विद्यार्थ्यांच्या मनात महापुरुषांचे विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो . विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.

  • गुणवत्ता : विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी गुणवत्ता पूरक शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ वाचन लेखन प्रकल्प, जादा तास, शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन, तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व्याख्याने, अक्षर सुधार प्रकल्प, मासिक चाचण्या, सत्र परीक्षा यांचे यशस्वी आयोजन केले जाते. एसएससी परीक्षेचा निकाल अनेक वेळा 100% लावून विद्यार्थ्यांनी विद्यालयाची मान उंचावलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील प्राप्त झालेली आहे. NMMS परीक्षेत देखील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. तसेच एमटीएस परीक्षेचे कार्य विज्ञान शिक्षक यशस्वीपणे पाहतात.

  • शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था : विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ विहिरीचे पाणी असते. ज्या टाकीमध्ये पाणी साठवले जाते त्या टाकीची नियमित स्वच्छता केली जाते. मुळातच पाणी खडकातील असल्यामुळे ते शुद्ध व गोड आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत इंधन किंवा लाईट गेली असल्यास पिण्यासाठी हातपंपाची व्यवस्था आहे. त्यामुळे कोणतीही गैरसोय होत नाही.

  • नियमित फलक लेखन : विद्यालयात प्रत्येक वर्गखोली जवळ एक फळा आहे. त्यावर प्रेरक सुविचार किंवा विषयानुरूप चित्र काढले जातात. फलक लेखन नियमित सुंदर अक्षरात केले जाते. शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्र काढलेली आहेत. जसं घराची कळा अंगण सांगते तसंच फलक लेखनातून शाळेचे संपूर्ण चित्र समजते. सुंदर अशा अक्षरात फलक लेखन व चित्र काढण्याचे काम विद्यालयातील कलाशिक्षक श्री प्रदीपकुमार मिरगे करतात.

  • शालेय परिपाठ : विद्यालयात नियमित पणे प्रार्थना व शालेय परिपाठ घेतला जातो. यामध्ये दैनंदिन ठळक बातम्या, सुविचार, बोधकथा प्रत्येक इयत्तेनुसार सांगितले जाते. परिपाठात नाविन्य असते. प्रत्येक दिवशी नवीन प्रार्थना मुली म्हणतात. परिपाठात ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. परिपाठ म्हणजे खऱ्या अर्थाने शालेय दिवसाची सुंदर सुरुवात असते. प्रार्थनेने मन शुद्ध होते.

  • क्षेत्रभेटी : क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिल्याचा आनंद देता येतो. यासाठी अनेक वेळा क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ शिवनेरी किल्ला, नाणेघाट, रांजण खळगे, भंडारदरा, खोडद येथील जीएमआरटी सारख्या अनेक ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक ठिकाणी भेटी दिल्या जातात.

  • वार्षिक स्नेहसंमेलन : शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना सर्वात आवडता उत्सव म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. प्रत्येक वर्षी 20 डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असते. याचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन याच दिवशी संपन्न केले जाते. तीन दिवस हा उत्सव शिक्षण संकुलात मोठ्या दिमाखात चालतो. 18 तारखेला तालुकास्तरीय सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये फक्त प्राथमिक शाळांना सहभाग घेण्याची परवानगी असते. जवळपास 18 ते 20 शाळा सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. याच दरम्यान विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, यांचे देखील आयोजन केले जाते. 19 तारखेला बाबांची भव्य दिव्य मिरवणूक व सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले जाते. २० तारखेला सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बाबांची आरती व पूजा पाठ केले जाते आतापर्यंत अनेक कलाकार विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने येऊन गेले आहेत. यात अभिनेत्री रंजना, अशोक सराफ, मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर, डॉक्टर गंगवाल, विशुभाऊ बापट, श्री.राघवेंद्र कडकोड, भारत गणेशपुरे इत्यादींचा समावेश आहे.

विद्यालयाची आन, बाण आणि शान म्हणजेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी गाडगे महाराज शिक्षण संकुलात गेली 50 वर्षापासून एसएससी परीक्षेचे केंद्र आहे. जवळपास हजार ते अकराशे विद्यार्थी या केंद्रात परीक्षार्थी असतात. विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकालाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. विद्यालयातील अनेक विद्यार्थी हे मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. काही शास्त्रज्ञ झाले आहेत. काही वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. काही काळ्या आईची निस्वार्थपणे सेवा करून समाजसेवा करीत आहेत.

डॉ.रामदास डामसे ( आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, DRDO ), डॉ.अमोल वाकचौरे, डॉ.गणेश वाकचौरे, डॉ.जय दाते, ऋषी घोलप, डॉ.राजेंद्र फलके, डॉ.युवराज ढमाले, डॉ.राहुल भागवत, डॉ. प्रेमानंद कचाटे, प्रणाली साबळे, डॉ.मिलिंद सानप ( ऑस्ट्रेलिया ), डॉ. हर्शल पाटील आदी गुणवंत विद्यार्थी आहेत. प्राध्यापक डॉ.विलास पोळ यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवत आवर्त सारणीतील सर्व रासायनिक घटकांची मांडणी विक्रमी वेळेत केली. डॉ. वैभव शांताराम हेंद्रे यांनी पी.एच.डी. पदवी मिळवलेली असून सध्या ते जी.एच.रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथे कार्यरत आहेत. श्री.प्रविण तुळशिदास शिरसाठ हे मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. कु. विशाखा कैलास महाजन हिने बी.एस्सी.ला ९४.०० टक्के गुण मिळवून गणित व भौतिकशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे मधून प्रथम क्रमांक पटकावला. शुभम केशव बकाल याची एम.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवून पी.एस.आय.पदी निवड झाली. डॉ.अपूर्वा सुभाष मुळे ने सुक्ष्मजीवशास्त्र या विषयात इटली येथे पी.एच.डी. पदवी मिळवली. चिराग अनिल ढोबळे याची Life Insurance Corporation of India, Mumbai अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत Development Officer या पदावर नियुक्ती झाली. असे हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. यातून राष्ट्राच्या उभारणीत मोलाची भर पडत आहे. डॉ.राहुल भागवत, डॉ. प्रेमानंद कचाटे,