Quality in Education
Ideal Educational Campus
Its Time to Dream , Achieve and Succeed. Enroll with us.
Discover More'सेवा परमो धर्म:' हे ब्रीद जपत श्री गाडगे महाराज यांच्या विचारांनी श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर हे शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.
शिक्षणाची आवड असलेले अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात व बालमजुरी, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे आपले सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे. अनेक समास्यांच्या मुळाशी जाऊन शोध घेतला, तर शिक्षणाचा अभाव हे त्याचे मूळ असल्याचे आपल्या लक्षात येते. याच जाणिवेतून श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे वंचित, गरजू आदिवासी, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा मोफत पुरविण्याचे काम केले जात आहे. आपणास उपलब्ध होणाऱ्या मदतीतून विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण, नाष्टा, गणवेश, नाईट ड्रेस, अंथरूण, पांघरूण, ताट, वाटी, पेटी, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी, ब्रश, छत्री, आरोग्यविषयक सुविधा, क्रीडा साहित्य, मुलींसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य इत्यादी साहित्याचे वाटप करत असतो. शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असाधारण असा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
आमच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. आपल्या दातृत्वातून व पुढाकारातून या गरजू व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाची मदत होणार आहे. यातूनच उद्याचा सक्षम भारत घडविला जाणार आहे.
समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्यांनी आपलं दान जर योग्य ठिकाणी दिलं तर निश्चित अर्थाने उद्याचे सुजान नागरिक आपल्या मदतीने घडणार आहेत आणि हे दान खरोखर इतर दाना पेक्षा निश्चित श्रेष्ठ असेल. धनाची शुद्धी ही दानाने होते असं म्हणतात. जस शरीर अंघोळीने शुद्ध होते, मन चांगल्या विचारांनी शुद्ध होतं, तसे धनाची शुद्धी योग्य पद्धतीच्या दानाने होते.
आमच्या या मागणीचा आपण निश्चित अर्थाने विचार करून गाडगे बाबांचे हे कार्य व विचार प्रणाली पुढे नेण्यास एक हात आपलाही मदतीचा असेल अशी अपेक्षा धरतो.
गाडगे बाबा लोकांना नेहमी सांगायचे "बापहो! जेवणाचं ताट मोडा, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या पण पोराले शाळेत धाडल्या बिगर राहू नका". गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही, परंतु ते लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून देत होते. आपण तर सर्वच सुशिक्षित आहोत. आपण निश्चित अर्थाने मदतीचा हाथ पुढे कराल ही सकारात्मकता ठेऊन आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करत आहोत.
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथील चिमुकल्या कळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी आपण खालील पत्त्यावर आर्थिक मदत देऊ शकता...