Thumb

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

नमस्कार मंडळी, आज मी तुम्हांला घेऊन जाणार आहे…आठवणींच्या दुनियेत. जगुयात पुन्हा एकदा बालपणात! शिक्षकांच्या छड्या खाऊन मोठे झालेले, छड्या चुकवून मोठे झालेले आणि छड्या खाऊन स्वतः चं आयुष्य बदललेल्या सर्वच मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी घेण्याचा योग आलाय. काय मग, एव्हाना लक्षात आलंच असेल ना तुमच्या! तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत आपल्या शालेय जडणघडणीतील महत्वाच्या प्रत्येक व्यक्तीला. कुणाला आठवणीत आठवून तर कुणाला डोळे भरून पाहणार आहोत. आज पोहोचलोय आपण ओतूर नगरीतील श्री. गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी. निमित्त आहे स्नेहमेळाव्याचं, तेही अगदी 1960 सालापासून ते सन 2023 पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे. काय मग, शॉक झालात ना! असा आगळा वेगळा स्नेहमेळावा अनुभवलाय का कधी? नाही ना? तर मग, आपल्या Swatisoham चॅनेलला संपूर्ण video upload केला आहे. नक्की पहा आणि जगा या स्नेहमेळाव्यात. शाळेच्या वतीने ना सुंदर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांचे स्वागत मात्र भलत्याच प्रकारे केलं गेलं. बघा बघा, सर कशा छड्या देताहेत विध्यार्थ्यांना! आणि विध्यार्थी पण हसऱ्या चेहऱ्याने छड्या घेताहेत. जरा जगवेगळीच ही आजची शाळा भरलीय. जरा आठवून बघा बरं, शाळेत असताना एवढ्या आनंदाने कुणी छड्या खाल्ल्या होत्या! आणि खाल्याच असतील तर मला कंमेंट करून नक्कीच सांगा बरं! आणि हो सांगायचंच राहिलं, छडीबरोबर तिळाचा लाडुही सरांनी भरवला. म्हणजेच काय तर, शिस्तही आम्हीच लावणार आणि मायाही आम्हीच करणार असं जणू या सर्व शिक्षकांना सांगायचं होतं. यानंतर, आलेल्या सर्व विदयार्थ्यांचं पुष्पसुमने उधळून स्वागत करण्यात आले. याच बरोबरीला व्यासपीठावरून शब्दसु्मनांची उधळण करत स्वागत करत होते विद्यालयाचे माजी विध्यार्थी संजय गवांदे. काय तो स्वागतसोहळा, सगळे अगदी भारावून गेले होते. त्याकाळी, शिक्षकांना घाबरणारे माजी विध्यार्थी आजही त्याच आदराने शिक्षकांकडे पहात होते. आणि तेव्हा येवढु येवढुशी असणारी पोरं आज मोठमोठे साहेब बियेब होऊन समोर बसलीत हे बघून शिक्षकही भारावून गेले होते, भावुक झाले होते. मनोमन म्हणत होते, आपण घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. काय तो सोहळा वर्णावा या स्नेहमेळाव्याचा! यानंतर, विद्यालयाचे माजी विदयार्थी आणि पहिल्या बॅचचे, पहिले विद्यार्थी असे मानांकन पटकावलेले जयसिंग अस्वार यांनी यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून शाळा भरवण्यात आली. इकडं तिकडं फिरत बसणारी पोरं- पोरी पटकन जागेवर येऊन बसली, तेही अगदी शिस्तीत! कातोरे सरांनी सूचना देत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि महाराष्ट्र गीत घेतले. आजही सर्वांना राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा सर्वांना तोंडपाठ होती. त्यानंतर स्वागतगीत, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. स्वागतसोहळा पार पडताच या विद्यालयाला ज्या दिवंगत थोरा - मोठ्यांचे योगदान लाभले त्यांचा परिचय विद्यालयाचे शिक्षक अहिनवे सर आणि शोभा तांबे मॅडम यांनी करून दिला आणि सर्वांनी आदरांजली वाहिली. यानंतर, सर्व माजी शिक्षकांचा मोठ्या मानाने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कातोरे सर तर एवढे भावुक झाले की त्यांना शब्दच फुटत नव्हते. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची यापेक्षा वेगळी अवस्था ती काय असणार! नजर जरा स्टेजवर गेली तर पाहिलं, घुले मॅडमच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यातच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून एका टवराट पोराचा आवाज आला, कातोरे सर आज पाठीत धपाटा नका देऊ. त्याला लगेच दुसऱ्या जरा शहाण्या पोराने आवाज टाकला, या धपाट्यानेच शिस्त लागली सर आम्हाला, आजही धपाटा मिळाला तरी चालेल. आणि भावुक झालेलं वातावरण थोडं हलकंफुलकं झालं. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर ही पोरंसोरं थोडीचं ऐकणार होती! याच शिक्षकांनी घडवलेले ते कोहिनुर हिरे म्हटल्यावर भलीमोठी यादी यांचीही आलीच मनोगत व्यक्त करायला! सर्वांनाच आठवणी सांगायच्या होत्या. परंतु, वेळेअभावी ते काही शक्य नव्हतं. तरी, काही खोडसाळ पोरं पोरी लाईन लावूनच थांबले होते. म्हणजेच काय तर, नियमबाह्य काम शिस्तीत केल्यासारखं! काय तर म्हणे, मला पण बोलायचंय. आठवा जरा मेंदूला ताण देऊन, शाळेत असताना होती का येवढी डेरिंग स्टेजवर बोलायची! आणि असेच हे अनमोल हिरे घडवले होते गाडगे महाराज विद्यालयाने. यामध्ये विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमेश डुंबरे यांनी छान संकल्पना मांडली, ती म्हणजे शाळा नूतनीकरणाची! खर्चाचा अंदाज देऊन स्वतः ची मदत लगेच जाहीर केली. आणि मित्र परिवाराला मदतीचं आवाहन केलं. आगळंवेगळं रूप शाळेला देण्याचा सर्वांचा मानस यावेळी प्रकर्षाने दिसून आला. येणाऱ्या पिढीसाठी आधुनिक गोष्टी या शाळेच्या माध्यमातून सहज शक्य होईल, म्हणून आले सगळेच पुढे. आणि खरंतर, ज्यावेळी या शाळेचं नूतनीकरण पूर्ण होईल त्यावेळी सर्वांचेच डोळे दिपतील असं प्रेझेंटेशन राजलक्ष्मी मॅडम यांनी लागलीच दिलं. सर्वजण अवाक होऊन पाहतच राहिले. काहींना तर हा माझा वर्ग, हा माझा बेंच या आठवणी वेड लावत होत्या. आणि तेच दिवस आठवून बसल्या की वर्गात! मग मी पण जरा शिस्तीतच वर्ग भरवला. घेऊ म्हटलं यांना जरा रिंगणात! पण, अंगठे धरायची वेळ काय कुणावर आली नाही कारण जीवन जगण्याच्या प्रवासात या तर अजूनच हुशार झाल्यात. यानंतर, सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. कारण, वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची!जेवणाचा बेत येवढा भारी होता ना, की काय सांगायचंय!चक्क मासवडीचं जेवण, आहाहा! जरा फेरफटका मारला तर चुलीच्या आहारावर भाकरी भाजत होत्या. गावभर मासवड्या, खंडीभर रस्सा आमचीच वाट पहात होता. हळुच बुंदीबाई डोकावून पहात होती. आणि म्हणत होती, पोरींनो मला विसराल गं. तिला धीर देत म्हटलं नाही गं बाई, तुला विसरून कसं चालेल! मासवडीचा झटका शांत करायला शेवटी मोर्चा तुझ्याकडेच वळणार ना! मग काय, खुदकन हसली! आणि आम्ही जेवणावर यथेच्छ ताव मारला. आता वेळ झाली होती निरोप घेण्याची. छान, सुंदर सोहळा पार पडला आणि या गोड आठवणींचं गाठोडं घेऊन निघाले पुन्हा अशाच स्नेहमेळाव्याची वाट पहात. भेटूयात पुन्हा लवकरच.

Next Post