
-
gmvotur
- 2024-03-05
प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ
प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फडकावला! प्राध्यापक पोळ यांनी आवर्तसारणीमधील (ऊर्फ पिरिऑडिक टेबल) सर्व मूलभूत रासायनिक घटकांची मांडणी जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत केली. विलास पोळ पर्ड्यू विद्यापीठ (इंडियाना- अमेरिका) येथे केमिकल इंजिनीयरिंग विभागात प्राध्यापकी करतात. शिवाय, ते भारतात इंदूरच्या आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि आयआयटीच्या पदवीच्या व पदव्युत्तर काही विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ या पदावर काम करत असून, त्यांनी गेली चार-पाच वर्षें गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची पुस्तके त्यांच्या मुलांना आणि पती विलास यांना भेट दिली. त्या उपक्रमातून विलास यांना आणि त्या दांपत्याच्या मुलांनाही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या कथा वाचण्याची प्रेरणा मिळाली. विलास यांनी त्यांच्या मुलांबरोबर ती पुस्तके वाचली आणि रसायनशास्त्र व केमिकल इंजिनीयरिंग क्षेत्रात नवीन ‘करिष्मा’ करण्याचा निर्णय घेतला, उद्देश हा, की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि जागतिक समुदायाला प्रेरणा मिळावी! विलास पोळ यांनी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तून रसायनशास्त्रात एम एससी, एम फिल आणि इस्रायलमधील बार-इलान विद्यापीठातून पीएच डी पदवी मिळवली आहे. ते स्वत: रसायनशास्त्रज्ञ असल्याने, त्यांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर- ‘मॉडर्न पिरिऑडिक टेबल’मधील घटकांच्या मांडणीवर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी तयारी करण्याचे ठरवले. मग त्यांनी संपूर्ण आधुनिक पिरिऑडिक टेबल आणि घटक यांचे गुणधर्म नीट लक्षात ठेवले. विलास यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यावर त्यांना त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु व्यवस्थापनाला तो विक्रम करण्यासाठी विशिष्ट पद्धत हवी होती. ती म्हणजे 2 इंच x 2 इंच आकाराच्या प्रत्येक सिरॅमिक टाइलवर पिरिऑडिक टेबलमधील घटकांची चिन्हे लिहून तशा टाइल्सचा एक ढीग करावा. त्यानंतर, पिरिऑडिक टेबलची कोणतीही बाह्यरेषा दिलेली नसताना, त्या ढिगातील सिरॅमिक टाइल्स योग्य रीतीने मांडाव्यात आणि ती मांडणी कोठल्याही दोन टाइल्समधे अंतर अथवा फट न ठेवता करावी. ते आव्हान निश्चितच अवघड होते! विलास पोळ यांनी त्या पद्धतीने पिरिऑडिक टेबलमधील घटकांच्या मांडणीचा अभ्यासपूर्ण सराव तीन आठवडे केला आणि 15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी एका मोठ्या टेबलवर पिरिऑडिक टेबलच्या सर्व घटकांची मांडणी अचूक करून त्यासाठी आठ मिनिटे आणि छत्तीस सेकंदांचे आजवरचे सर्वाधिक कमी वेळाचे नवीन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केले. ‘सध्याचे विद्यार्थी व नवीन पिढी यांना पिरिऑडिक टेबल अगदी व्यवस्थितपणे पाठ असावेत. कारण ते नवीन वैज्ञानिक संशोधनांचा पाया आहे असे विलास यांचे मत आहे. मानवी शरीरात पिरिऑडिक टेबलमधील सुमारे तीस घटक असतात, तर सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये सर्व आवश्यक चुंबकीय, ऑप्टिकल व कार्यन्वयन प्रणाली मिळवण्यासाठी पंच्याहत्तर घटक (एकशे अठरा घटकांपैकी) आहेत. हे घटक स्मार्ट फोनमध्ये असल्याने, स्मार्ट फोन मानवापेक्षा हुशार ठरण्यास कारणीभूत आहे असे विलास पोळ सांगतात. पिरिऑडिक टेबल दीडशे वर्षांपूवी दिमित्री मेडेलीव यांनी सर्वप्रथम तयार केले. यंदा पिरिऑडिक टेबलप्रमाणे पर्ड्यू विद्यापीठाचेही दीडशेवे वर्धापनवर्ष साजरे होत आहे. पर्ड्यू विद्यापीठाप्रमाणे, पिरिऑडिक टेबलही दीडशे वर्षांत सातत्याने विकसित होत गेले आहे. त्यात सध्याच्या काळातील शेवटचा एक घटक 2016 साली जोडला गेला. विलास पोळ यांच्या या पहिल्या यशस्वी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नंतर, आता, सामाजिक आवडीशी निगडित एकाद्या नवीन वैज्ञानिक विषयावर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा विलास पोळ यांचा मानस आहे. डॉ.विलास पोळ हे आपल्या श्री गाडगे महाराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जगात झळकावले याचा श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा...!