
-
gmvotur
- 2024-03-26
स्नेह मेळावा माजी विद्यार्थी मनोगत
वाढत चाललेली गुन्हेगारी व व्यसनाधीनता बघता शालेय शिस्तीला किती महत्त्व आहे हे प्रत्येकाच्या मनात जागृत झाल्याशिवाय राहत नाही. श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलातील शिस्त आज आपल्या जीवनात किती महत्त्वाची ठरत आहे याची कल्पना अनेकांना आल्याशिवाय राहत नाही. आपली माजी विद्यार्थिनी वर्षा पाटील ( गुंजाळ ) यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जातात.... _______________________________________________ मी वर्षा पाटील (गुंजाळ) दहावी बॅच 1987. मैत्रीचं नातं आणि शाळेची ओढ, किती अतूट असते, हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. गाडगे महाराज विद्यालय... नुसतं नाव उच्चारलं तरी मनात अनेक भावनांचा कल्लोळ उमटतो. मी शाळेच्या 1987 च्या बॅचच्या विद्यार्थिनी. त्याला आता 35 वर्षे झाली, इतका प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतरही तेव्हाची, शाळेची ती आपुलकी, ती ओढ अजूनही कायम आहे. माझ्या शाळेने मला काय दिले? प्रेम दिले, आपुलकी दिली, शिस्त शिकवली, कलागुणांना वाव दिला, आत्मविश्वास दिला, सकारात्मक दृष्टिकोन दिला, जो पुढील आयुष्यात माणूस म्हणून जगण्यात, व्यवसायात, करिअरमध्ये सतत उपयोगी पडत आहे. शाळेत आम्हाला उत्तमोत्तम गुरुजन लाभले. मोरे सरांची इंग्लिश शिकवण्याची हातोटी आणि आम्ही काहीतरी चांगले शिकावे याची तळमळ. मेहेर सर यांचे सुरेख अक्षर आणि आश्वासक हास्य. गंवादे मॅम, ताजणे मॅम, हुलावडे मॅम, तांबे मॅम, यांचे लहान मुलांना शिकवण्याचे कौशल्य. कचाटे सर, शिंगोटे सर, कातोरे सर, यांचे पाठ्यपुस्तकासोबत इतर गोष्टीचे उकलून सांगितलेले ज्ञान. सहाणे सर, भागवत सर, सातपुते सर, यांचे गणित, विज्ञान शिकवण्याचे कसब, देशमुख सर, फापाळे सर, घोलप सर, कोल्हे सर... कितीतरी आठवणी आज इतक्या वर्षानंतर ही ताज्या आहेत. या गुरुजनांनी संस्कार दिले, शिस्तीचे महत्व शिकवले, वेळ प्रसंगी कठोर उपाययोजना ही केल्या, पण त्यातूनच आमचे व्यक्तिमत्व घडले. त्यावेळी त्या वयाला त्याचे महत्त्व कळत नव्हते, पण पुढे आयुष्यात विविध क्षेत्रात काम करताना, विविध प्रसंग हाताळताना, विविध चॅलेंज स्वीकारताना, ते कायम जाणवत आहे. त्यामुळे एखादा माणूस जसा आता आहे, तसा त्याला घडविण्यात, जिथे त्याने, आपल्या आयुष्याची अनेक वर्षे घालवली, त्या शाळेचा खूप मोठा वाटा असतो. आणि आज खरोखरच मी ज्या प्रकारे वागते, बोलते, विचार करते,शिकते, माझी मते मांडते, यामध्ये मला माझ्या शाळेनी दिलेल्या संस्काराचीच शिदोरी आहे. कुठलीही शाळा म्हणजे फक्त शाळेची इमारत नाही, वह्या पुस्तकं नाहीत, अभ्यास, परीक्षा, मार्क्स नाहीत. शाळा या सर्व गोष्टीपेक्षा नक्कीच मोठी आहे. शाळा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक आधार देते, आकार देते, आणि असंख्य वेगवेगळ्या अनुभवांनी तुमचं आयुष्य समृद्ध करते. माझ्या शाळेने ही मला असेच वेगवेगळे अनुभव दिले, जीवनाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला, आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे सामाजिक भान... आणि हे सामाजिक भान लक्षात ठेवून आमच्या 1987 च्या बॅच कडून नक्कीच शाळेच्या नवीन वास्तूसाठी हातभार लागेल. आत्तापर्यंतच्या मुलांचे करियरचे क्षेत्र वेगळे होते. तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च पदापर्यंत पोहोचून आपला ठसा उमटविला आहे. क्रीडा क्षेत्र, अवकाश क्षेत्र, कॉम्प्युटर मधील ए आय, भूगर्भशास्त्र, सैनिकी क्षेत्र, यामध्येही आपल्या शाळेतील मुले पुढे गेली पाहिजेत. शाळेच्या नवीन मॉडेल मध्ये उपलब्ध असलेल्या सोयी, सुविधा नक्कीच या पिढीला मिळतील, आणि असे कुठलेही क्षेत्र उरणार नाही की, जिथे गाडगे महाराज विद्यालयाचा विद्यार्थी नसेल. शाळा कॉलेजचे दिवस संपले की, प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो, मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, त्या शाळेतील वेगवेगळ्या स्वभावाच्या विद्यार्थ्यांबरोबर, मैत्रीचे जे नाते जोडले, ते बंध मात्र तसेच असतात. एकमेकांबद्दल असलेला आदर, प्रेम तसूभरही कमी झालेला नसतो. कालच्या महामेळाव्या पेक्षा सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे,आमचा बॅचला आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मिळालेले निमंत्रण. या कार्यक्रमासाठीचे अध्यक्ष पद डॉ. मिलिंद सानप यांनी भूषविले व आम्ही सर्व 1987 च्या बॅचचे माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो होतो. स्नेहसंमेलनाच्या दिवशी पुन्हा एकदा आमचा वर्ग भरला. ज्या बेंचवर बसून शिक्षण घेतलं, त्यावर पुन्हा बसताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. जुन्या आठवणीने मन अगदी भरून आले होते. आमच्या या सर्व मित्रांना उदंड आयुष्य लाभो व आमची ही अतूट मैत्री अशीच बहरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.