
-
gmvotur
- 2024-02-25
शाळेच्या आठवणी
श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलातील अनेक विद्यार्थी आता आपल्या आठवणी मांडू लागलेत. यातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. भूतकाळातील आठवणी वाचून, ऐकून अनेकांच्या मनावर एक वेगळे चैतन्य निर्माण होत आहे. आपले माजी विद्यार्थी Sunil Vaidya यांची एक पोस्ट तत्कालीन शाळेच्या मौलिक पैलूंवर भाष्य करत आहे.... नक्की वाचा..... _______________________________________________ श्री गाडगे महाराज विद्यालयात आम्ही जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळची शाळा आजुनही नजरेसमोर आहे..जिल्हा परिषदेच्या शाळेतुन जेव्हा ह्या मोठ्या शाळेत आलो त्यावेळी ह्या शाळेच्या मोठमोठ्या इमारती पाहुन, मुलांची संख्या पाहुन जिव दडपुन गेला होता... सगळं वातावरण नवखं वाटत होतं...प्रवेश घेऊन जेव्हा वर्गात प्रवेश केला त्यावेळी बेंचवर बसायला मिळणार ह्याचं कुतुहल होतं...त्यावेळी बेंचवर बसलो तर पाय जमिनीवर टेकत नव्हते...पायाला रग लागायची.. एकेका बेंचवर तिन तिन मुले बसायची...ही शाळा त्यावेळी इतकी फॉर्म मधे होती.. एकेका तुकडीत साठ साठ मुलं असायची.. वर्ग गच्च भरलेला.. प्रत्येक विषय शिकवायला वेगळे सर असायचे.... मराठी शाळेत शिक्षकांना गुरुजी म्हणायचो. पण हायस्कूल मधे शिक्षकांना सर म्हणावे लागे....त्यावेळचे सगळे शिक्षक अत्यंत शिस्तप्रिय होते...त्यांचा धाक होता... तेव्हा बहुतेक सगळे शिक्षक गावात सदगुरु भुवन म्हणुन त्यातल्या त्यात चांगली इमारत असल्याने ते ह्याठिकाणी रहायचे.. माझे घर ह्याच आळीत असल्याने कधीही घराचे बाहेर निघालो तर शिक्षक रस्त्यावर भेटायचे... त्यांच्या समोरून जायला भिती वाटत असे.... मनावर सतत दडपण होते... पहीले वर्षे असेच दडपणाखाली गेले त्यानंतर मात्र जरा सरावलो आणि ताजणेबाई, हुलावळेबाई, कातोरे सर, फापाळेसर, मेहेरसर ह्यांचा आवडता विद्यार्थी झालो... ह्या शाळेतील पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी.. त्यावेळची परेड, गावातुन निघणारी प्रभातफेरी आजुनही डोळ्यासमोर आहे...शाळेचे स्नेहसंमेलन त्यावेळची ती दोन तीन दिवस चालणारी धामधूम... शाळेतील खेळाच्या स्पर्धा.. सगळं भारावलेलं होतं...आता ओतुर चारही बाजुने वाढलयं पण तेव्हा ही शाळा गावापासून खुप लांब आहे असं वाटायचं...वेशी बाहेर पडल्यानंतर शाळेकडे जाताना मोठी वड पिंपळाची, कडुलिंबाची झाडं होती.. तर शाळेच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला एक पिंपळाचं झाड होतं..त्याखाली शेंदूर फासलेला दगड होता... शाळेत जाताना ऊशीर झाला तर घाईघाईने ह्या दगडाच्या पाया पडायचं...हे केलं की शिक्षक ओरडणार नाहीत अशी आमची समजुन झाली होती...तसेच परिक्षेला जातांना पेपर सोपा जावा म्हणुन ह्याच पिंपळाच्या झाडाची हाताच्या करंगळीने साल काढायची...ती निघाली की पेपर सोपा जाणार ही एक भाबडी समजून होती...गंमत अशी की, मुलांनी ह्या झाडाची साल काढुन ते गुळगुळीत केलं होतं. शाळा लांब असल्याने शाळेत डबा घेऊन जावं लागत होतं...आम्ही मित्र मधल्या सुट्टीत तुकाराम महाराजांच्या मंदीरा समोर एक लहान समाधी मंदिर आहे ...त्याचे कट्ट्यावर बसुन डबे खायचो...ते मंदिर आजुन त्याठिकाणी आहे....ह्या शाळेच्या अनेक आठवणी आहेत... कुणीतरी म्हटलयं..."तुम्ही गाव सोडुन नोकरी धंद्यासाठी निघुन जाल..पण तुमच्या मनातले शाळेचे दिवस,शाळा कधीच दुर जाणार नाहीत..."..ह्या शाळेने मला काय दिलं...तर मी म्हणेल..ह्या शाळेने मला चांगले शिक्षक दिले...चांगले मित्र दिले...जगायचं कसं हे ह्या शाळेने शिकवलं...ह्या शाळेने भविष्याचा मार्ग दाखवला...जग दाखवलं...कसं बोलावं कसं वागावं हे शिकवलं...ह्या शाळेने जिवनाचा मार्ग दाखवला... ह्याच शाळेने भविष्य घडवलं....अशी ही माझी शाळा...गाडगे महाराज विद्यालय ओतुर... .... सुनील वैद्य....