
-
gmvotur
- 2024-02-25
स्नेह मेळावा
स्नेह मेळावा झाल्यानंतर अनेक उपस्थितांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींना तर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड जात होतं, म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या कडा काहीशा नकळत ओलावल्या होत्या. अनेकांना आपल्या शब्दांना आवर घालताही येत नव्हता. सदर मेळाव्यास काहींची इच्छा असूनही कामात व्यस्त असल्याने येता न आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. त्यातीलच एक खाली देत आहोत.... खरं तर खाली दिलेली प्रतिक्रिया म्हणजे श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाचे दिसून न येणारे यश आहे. वै. प्र. मा. पाटील साहेब यांनी वसतिगृह सुविधा उपलब्ध केल्याने, कित्येक विद्यार्थ्यांचे कल्याण झाले असेल ही बाब शब्दात व्यक्त करण्यासारखी नक्कीच नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात राहून आपल्या आयुष्याचे स्वप्न साकार केले त्यांच्यासाठी याचे मोल किती असेल याचा विचार होणे महत्त्वपूर्ण आहे. ऋणानुबंध म्हणजे काय आणि तो कसा जपला पाहिजे याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे. ही ऊर्जा आपल्या माजी विद्यार्थ्यांत या स्नेहमेळाव्यातून निर्माण होण्यास मदत झाली हे मात्र नक्की _______________________________________________ सर, काल झालेल्या स्नेह मेळाव्याला काही अपरिहार्य कारणामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर राहील. खंत यासाठी आहे कि असा हा दुर्मिळ योग जीवनामध्ये फार कमी वेळेस येतो. उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल शाळेची, सर्व शिक्षक व्रृंदाची, संचालकांची, विद्यार्थ्यांची व पूर्ण संकुलाची मी क्षमा मागतो. दिलगिरी व्यक्त करतो. परंतु वैयक्तिक माझ्यासाठी माझ्या शाळेने संस्थेने मला कुठलाही आदेश द्यावा, तो मी सिरसावंद्य मानुन पुर्ण करेल याची मी ग्वाही देतो आणि संस्थेच्या आदेशाची वाट पाहतो (नविन शाळा संकुल बांधकाम). कालचा दिवस खरंतर फार अस्वस्थतेत गेला कारण हा दुर्मिळ योग परत केव्हा येईल हे नक्की नाही. परत एकदा माझ्या संस्थेची संकुलाची माफी मागतो आणि पुढील आदेशाची वाट पाहतो. संत गाडगे बाबांच्या चरणांशी शतशः नमन. दादांचा वारसा पुढे नेण्यास व आपले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आपणा सोबत आहोत. आपलाच, दत्तात्रय राधुजी मनसुक. 1988 दहावी बॅचचा वसतिगृहातील विद्यार्थी